आज पर्यंत आपण बघितलंय एका सैनिकाच्या आईला ते फक्त आपल्या मुलाची वाट पाहतांना , त्याच्या विरहात अश्रू ढळतांना. पण ही झाली नाण्याची एक बाजू,. ज्या घट्ट हृदयाने ती माउली तिच्या लेकराला रणांगणावर पाठवते, ते सामान्य बुद्धीस समजणे म्हणजे अशक्यच.
तरीही तिच्या मनातील या गुप्त भावना मांडण्याचा हा नाजूक आणि तेवढाच भावुक प्रयत्न. हि कविता म्हणजे लढाईला उभा असणारा एक वीरपुत्र आणि त्याला साद घालणारी त्याला धीर देणारी ही मायेची प्रेमाची पण कर्तव्याची जाणीव करून देणारी चिठ्ठीच ....
माफ कर हं बाळा,
आज अचानक तुझी आठवण झाली.
आणि या पत्राने माझं लक्ष वेधलं.
कदाचित फोन वर सुद्धा
बोलू शकले असते,
पण ते धाडस नाही करत मन.
बघ जरा, सांभाळ,
वेळ खूप बिकट आहे,
शत्रू ठाकलेत सीमेवर.
तुझे मित्र, बंधू लढताहेत जन्ममृत्यूशी.
त्या विचारानेच माझं हृदय धडधडतंय,
आणि मनात कालवाकालव होतेय.
पण हो तू नको विसरूस,
जन्मभूमी ही जननीपेक्षा श्रेष्ठ आहे.
तू फिरू नकोस मागे,
हटू नकोस कर्तव्यास,
काढून टाक विचार मनातून,
माझा किंवा तुझ्या प्रियेचाही.
आमचं काय आहे ?
दोन दिवस अश्रू ओघळतील,
त्या शत्रूला दूषणे जातील,
आणि रमून जाऊ पुन्हा आम्ही,
तुझ्या या इवल्याशा,
लहानग्या प्रतिरूपात.
फक्त लक्षात ठेव एकच गोष्ट,
तु सैनिक आहेस या मातीचा,
शिवाजीचा अन प्रतापाचा.
दे टक्कर त्या शत्रूला,
निधड्या छातीने,
आणि कर सहन सगळी प्रतिकूलता.
तुझं शरीर जरी असेल पडलेलं,
रक्ताच्या थारोळ्यात.
तर समजव स्वतःला,
माझ्या पोटात देखील
असाच होतास तू ,
रक्तामासांत अडकलेला.
तुटून पड तू पूर्ण शक्तीनिशी,
या राष्ट्राच्या दुश्मनांवर.
आणि होउ दे त्यांचा खात्मा.
चुकूनही करू नकोस अपेक्षा,
कुठल्याही पदकाची, स्मारकाची.
प्रसंगी देआहुती तुझ्या प्राणांची.
या भूमातेच्या गर्भातून
होईल तुझा नवीन जन्म।
ते गंधर्व देखील
गातील तुझे शौर्य गीत,
स्वर्गातील देव तुला करतील वंदन,
हा राष्ट्रध्वज कवटाळेल तुला,
आणि ...... आणि ......
अमर होशील तू .
- मानस
Apratim.. 😇
ReplyDeletethank you
Deleteसुंदरचं
ReplyDeleteजय हो !!!